आज २५ जानेवारी, आप्पा उर्फ रघुनाथ रेडीज यांची आज दुसरी पुण्यतिथी !
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत "आंतरजातीय लग्न" या एका ध्येयाशी अविचल राह्यलेली ही व्यक्ती महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत एक अविस्मरणीय युग होय. सामाजिक चळवळीला त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याची महाराष्ट्राने जेवढी घ्यावी तेवढी घेतली नाही, ही खेदाची बाब आहे. आज महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह करणा-या दांपत्याला रू.५०००० इतकी रक्कम बक्षिस म्हणून देते, पण पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह व्हावेत म्हंणून जवळपास २५ वर्षे आपल्या निवडक सहका-यांसह तन - मन - धन अर्पून, खिशातील पैसा खर्चून, एखादा वधू-पिता जशा चपला झिजवतो, त्याप्रमाणे आप्पा आमची लग्नं जुळविण्यासाठी तहान भूक विसरून दिवस रात्र एक करीत होते.
माझं आणि माझ्या सारख्या काहीजणांची अशक्य वाटणारी लग्नं त्यांनी जुळविली, हा एक चमत्कारच मानायला हवा, लग्न जुळविण्याबरोबरच सर्वांशी सतत संपर्क ठेवणे, कुटुंबातील विरोध कमी होत दोन कुटुंबाचं मिलन होईल हे पाहणे, मेळावे - स्नेह-संमेलने भरविणे, शक्य तिथे किंवा मिळेल त्या व्यासपीठावर या संकल्पनेचा प्रचार करणे, सामाजिक कार्यकर्त्यांकडून विवाह-अर्ज भरून घेणे, तब्येतीची, उन, पाऊस, वा-यांची पर्वा न करता, मुंबईचा लोकल प्रवास करीत लोकांना भेटत राहणे, सर्वांना पत्र लिहीत राहणे...हे आम्ही पाहत होतो आणि ही चळवळ महाराष्ट्रभरात पोहचेल तेंव्हा त्यांच्या जीवाला शांती लाभेल असं आम्हाला वाटत राही.
ज्यांची आंतरजातीय लग्ने झाली आहेत, असे तरूण-तरूणी, व हा विचार ज्यांना मान्य आहे, असे हितचिंतक यांचा सर्वांचा मिळून अशा मोठ्या परिवाराचे ते कुटुंब प्रमुख होते. हा सुगावा परिवार त्यांनी मोठ्या मेहनतीने घडविला, त्या सुगावा परिवाराने काय काय केले, याची नोंद या निमित्ताने घ्यावी व सगळ्यापर्यंत पोहचवावी, असं माझ्या मनात होते. आज त्यांच्या दुस-या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या आणि आमच्या सुगावा परिवाराचा प्रवास जेवढा शक्य होता तेवढा आज आंतरजालावर प्रसिद्ध करायला मला खूप आनंद होत आहे. आज सुगावा परिवाराची माहिती देणारा व आप्पा रेडीज यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा ब्लॉग प्रसिद्ध करायला मला खूप आनंद होत आहे. अजून ब-याच जुन्या गोष्टी, लेख, कार्यक्रमाची माहिती यावर टाकली जाईल, आपल्या सूचना जरूर कळवा. ब्लॉगवर सदस्य व्हा.
Please visit www.pratibimb.info/sugava