कायरे गांव - ता. पेठ, जिल्हा - नासिक
अनेक वर्षापूर्वी अनेकदा आदिवासी पाडयावर जाण्याचा योग येत असे. ज्या आदिवासी पाड्यांवर जाणे झाले तेंव्हा मनात येणाऱ्या भावना आणि काल कायरे गावात भेटीच्या वेळी आलेल्या भावना यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. आपले खूप काही हरवलंय, कायरे गावात ते काहीतरी गवसले, आपण असंबद्ध भटकतोय, आता दिशा मिळाली, आपण खूप बडबड केली ज्याला आगा-पिच्छा काही नव्हता, त्या चर्चेला आता मूर्त स्वरूप मिळू शकेल असं वाटायला लागलं....
मी माझ्या डोक्यात काय आहे ते मांडतोय.. पहिल्यांदा निरीक्षणे, विश्लेषण तदनंतर माझी मते...
1. गावाचे वातावरण - श्यामलाने सांगितले की तिला ह्या गावात खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली. शंभर टक्के सहमत. त्याची कारणे आम्हांला स्पष्ट कळली. सगळे गाव गेल्या दहा वर्षांत अनेक वेळा घुसळलं गेलेय, गावाने खूप भोगलंय एकापेक्षा एक कठिण प्रसंग पण त्या संघर्षाच्या वेळी एका तरुणाने ह्या संघर्षाला एक नैतिक, तात्त्विक आणि वैचारिक अधिष्ठान दिले आणि त्यामुळे श्यामलाला केवळ एका भेटीत जी एनर्जी जाणवली ती आम्हांला जास्त भावली त्यामुळे गावातून निघताना आम्ही एकशे एक टक्के गावकरी झालोच.
2. ह्या गावात आदर्श होण्याची नक्की क्षमता आहे कारण गेल्या काही वर्षात जे काही तिथे घडलंय त्यामुळे एक पाया तयार झालाय, आपण आपल्या कल्पना तिथे प्रत्यक्षात आणू शकतो.
3. नेतृत्त्व - गावाला आज हेवा वाटावे असे नेतृत्त्व मिळालेय, 27 वर्षांचा सुशिक्षित, वैचारिक स्पष्ट, विचार-कृती-विचार यांचा संगम आणि कृतीवर जास्त भर देणारा, समाज-राजकारण यांची भान व सजगता, शासकीय योजनांची माहिती व त्या राबवण्यासाठी करावे लागणारी मेहनत व त्याच बरोबर जागेपणी स्वप्न पाहून सर्वांना बरोबर घेऊन नविन तरुणांना तयार करणारा तरूण सरपंच.... मला वाटते की त्याच्या मुळे त्याचे स्वप्न आमचे झाले. शनिवारी रात्री आम्हांला झोप लागली नाही हे त्यामुळेच... आदिवासी गावाला असे नेतृत्त्व लाभणे, अशा गावाशी आपला संपर्क होणे हा प्रचंड चांगला आणि पॉझिटिव्ह योगायोग आहे. आणि आपण इथे काही कृती केली नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच.
4. गावकऱ्यांची मानसिकता - सामाजिक संघर्ष तर सर्वांच्या पाचवीला पूजलेला आहे, आदिवासी समाजाच्या बाबतीत तर कदाचित जास्तच. या गावाने अलीकडच्या काळात केलेल्या संघर्षातून गावकरी मनाने एकत्र आलेत व सक्षम नेतृत्त्वामुळे विचाराने देखील. आपल्या स्थितीला आपणच जबाबदार आहोत आणि आपण एकत्र राह्यलो तर आपल्या परिस्थितीत चांगला बदल होईल अशी जाणीव बोलून दाखवणारे गावकरी
5. गावाचे व लोकांचे प्रश्न - तिन गावांचे प्रश्न वेगवेगळे पण आपल्या राजकीय प्रगतिचे वास्तव ठळकपणे पुढे आणणारे, प्रगत महाराष्ट्राची लाज काढणारे. गावात तारा आहेत पण वीज कुठे ? शेतीचे सोडा पिण्याच्या पाण्यासाठी 8 महीने काय करावे ही चिंता. शेती पावसाच्या भरवश्यावर पण हे चार महीने सोडल्यास 8 महीने रोजगार नाहीच. मग आठ महीने गाव सोडून रोजगारासाठी भटकंती. गाव तिथे एस.टी. आणि प्रत्येक गावात आरोग्य सुविधा असे आपण ऐकले पण इथल्या एका गावात आजारी माणसाला 4 किमी अंतरावर चादरीचा झोळ करूनच कोणाची गाड़ी असेल तर 20 किमी वरच्या इस्पितळात घेऊन जाता येते. 100 टक्के प्रसूती घरीच. एका गावात जमीन आहे पण पाणी नाही तर दुसऱ्या गावात पाणी आहे पण जमीन नाही, दोन्ही गावे एकाच ग्रुप ग्रामपंचायतीत पण एक गाव पायथ्याला तर दूसरे डोंगर माथ्याला. शाळा प्राथमिक, शिकायचे तर 15 किमी वरील आश्रम शाळेत चालत जा.
6. राजकारणाचा हस्तक्षेप - पाडा किंवा आदिवासी गाव म्हणून असेल गावात आदिवासी वगळता अन्य समाजाचे लोक नाहीत, सगळी घरे आदिवासींचींच. त्यामुळे आजतरी राजकारणाचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे तर आपल्याला काम करण्यासाठी मशागत योग्य पण एकूणच प्रश्नांचे स्वरूप व आव्हाने कठीण
थोड़े सरपंचाविषयी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कौटुंबिक पाठबळ नसताना पुस्तके वाचता वाचता एखाद्या तरूणाचा नेता, चांगल्या अर्थाने, होताना हयाने कसा संघर्ष केला हे त्याच्याच तोडून ऐकण्याचे आमचे भाग्य. बी.एस.सी. नंतर बी.ए. आणि एम्.ए. भरपूर वाचन, समोर घडणाऱ्या घटना त्यावेळी योग्य वैचारिक हस्तक्षेप करण्याची पात्रता आणि ढिटाई, योग्य आणि अयोग्य किंवा न्याय अन्याय शास्त्रीय युक्तिवादाने समोरच्याला निरुत्तर करण्याची क्षमता, या वैचारिक बैठकिला कृतीची जोड़, विचार करून अभ्यासाच्या जोरावर ठामपणे भूमिका घेण्याचे धैर्य यातून एखादा आंबेडकर जन्माला येतो. ते सर्व आम्हाला जाणवले पुंडलिक मध्ये. शासकीय योजनांची माहिती व् राबविणाऱ्या यंत्रणेचे भान त्याला आहे, त्याला आपल्या मदतीची गरज आहे का ? हा आम्हाला पडलेला प्रश्न.
आता गावाने केलेल्या संघर्षा विषयी थोडक्यात ...
गाव तसे साधे, आदिवासी परंपरा पाळणारे, पावसावर आधारीत शेती चार महिने बाकीच्या काळात शहरात स्थलांतर, शिक्षण आरोग्य सगळे होईल तसे, होईल तेंव्हा. जे होईल ते सोसत जायचं, जगत जायचं... गावाचा गाडा चाललाय जसा चालेल तसा... बाकी गावात आदिवासी परंपरेने वेठ-बिगार, इथे शेती करणारे हाच काय तो फरक ! अशा गावात नेहमीची भांडणं, नेहमीचे हेवे दावे...
पण याच गावात गावातल्या दोन कुटुंबाकडे थोडी जास्त ताकद, दादागिरी म्हणून हक्काचा मानपान. सणा सुदिला देवाच्या आधी त्यांचा मान, त्यांची पूजा. कोणत्याही वादामध्ये ते म्हणतील ती पूर्व दिशा, त्यांच्या विरोधात जाणारे आयुष्यातून उठतील एव्हढी दहशत. त्यांचं ऐकले नाही तर त्या माणसाला वाळीत टाकणार, रोटी बेटी व्यवहार बंद. अन्धश्रद्धांचा पगडा जबरदस्त, या दादागिरीच्या विरोधात गेलेल्या माणसाला कपट कारस्थान करून भूत ठरविले गेले (तो म्हणे ज्या शेताकडे बघे, ते उभं शेत जळून जाई), सगळ्या गावाला भगता मार्फत हे सिद्ध करून झाडाला बांधून दगडाने ठेचून त्याच्या बायका-मुलासमोर मारले गेले, हे प्रकरण देशभरात गाजले, या प्रकरणात शिक्षा झाली सामान्य गावक-यांना, हे दादा मात्र नाममात्र ! जंगलात लाकूडतोड करायला गावक-यांना जबरदस्ती पाठविले जायचे. का तर खटले चालवायला पैसा उभा करायला, लाकूड विकून आलेला पैसा मात्र यांच्या खिशात पुन्हा लाकूड चोरी मध्ये पोलिसांकडून पकडला जाणार निष्पाप गावकरी, नको ते सण साजरे करायला पैसा गोळा व्हायचा खंडणी सारखा, ज्याचा हिशोब कधी मिळायचा नाही.
वेळोवेळी हे चुकीचे होतंय, हे पुंडलिक दाखवून द्यायचा. असेच एक प्रकरण चिघळले, पोलिसाकडे गेले. गावात एक चर्च आहे, १६ ख्रिश्चन परिवार आहेत, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गावक-यांना भडकविण्यात आले, चर्च पाडले गेले, खूप हिंसाचार झाला, पुन्हा अडकले गावकरी आणि करणारे, फितवणारे नामानिराळे. या प्रकरणात आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही, तेंव्हा चर्चला विरोध न करण्याची भूमिका घेतल्याने पुंडलिक वर ह्या दादा लोकांनी बहिष्कार टाकला, त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले. गावक-यांना कळत होते कि अन्याय होतोय, प्रत्येक वेळी आपणच अडकतोय, हे कळायचे पण विरोध करायला कुणी धजावयाचे नाही
अशात एका प्रसंगात एका वाडीतल्या बायकांनी या दादा लोकांची पूजा केली नाही म्हणून बहिष्कार, जोर-जबरदस्ती आणि किल्ला लढविला बहिष्कृत पुंडलिकने, आणि ते प्रकरण धसास लाऊन या दादा लोकांना गावक-यांनी जागा दाखवून दिली. आणि पुंडलिक सरपंच झाला, त्याने गेल्या साडे-तीन वर्षात अनेक सरकारी योजना गावात आणल्या, पाण्यासाठी पाझर तलाव केले... गावात एकजूट झाली...
पुढे काय ? सरपंच पुंडलिक ने स्वप्न पाहिलंय आदर्श गावाचे... त्याने त्याप्रमाणे वाटचाल केलीय गेली तीन वर्षे... गावाची मानसिकता घडवलेय त्याने... त्याच्या म्हणण्यांनुसार तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांनी सांगितले तर गावकरी ऐकतील, रीस्पोंस देतील... काही प्रश्न गंभीर आहेत, सरकार दफ्तरी खूप पाठ-पुरावा करावा लागतो, पाठ-पुरावा करूनही निधी, राजकारणा मुळे कामं अडकतात... काही नवीन गोष्टी तुमच्या माध्यमातून येण्यातून प्रगतीला हातभार लागू शकतो... साथ-साथ चालण्याने कल्पना सुचू लागतील, विचारांची देवाण-घेवाण होईल.... मार्ग नक्की सापडलाय, पुंडलिक त्या मार्गावरून गावाला पुढे घेऊन जाईल, पण आपल्या मदतीने मार्ग-क्रमण सुलभ होईल... एव्हढं नक्की...
गावात शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, पाण्याच्या प्रश्नावर, वीज-पुरवठा, रोजगाराच्या बाबतीत आपण काही एक काम नक्की करू शकू... सरकारी योजनाच्या अंमलबजावणी च्या वेळी आपली भूमिका राहील. शहरातील काही संस्थाच्या मदतीने काही उपक्रम राबविले जाण्यासाठी आपली भूमिका असू शकते... CSR च्या माध्यमातून काही निधी गावाकडे वळवू शकतो. गावातील रस्ते, संडास व स्वच्छता या आघाडीवर NSS वा कॉलेज विद्यार्थी जोडले जाऊ शकतात...
बरंच काही करता येऊ शकते, जबाबदारी घेतली तर... पण आपल्याला जे वाटते तेच करता येईल असे नाही, तिथली गरज काय त्यावर कामाची बांधणी होऊ शकेल, त्यासाठी संपर्क वाढवावा लागेल, कामाला सुरुवात करावी लागेल.
0 comments:
Post a Comment